मुंबई, पुण्यातील मेट्रो कामांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन, शिवसेनेचा बहिष्कार

मुंबई | मुंबईच्या विस्तारित उपनगरांना जोडणारे मेट्रो प्रकल्प आणि पुण्यातील मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झाल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमांचे निमंत्रण नसल्यामुळे शिवसेनेन या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला.

कल्याणमध्ये सिडकोतर्फे उभारल्या जाणाऱ्या 90 हजार घरकुलांच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. साडेचार वर्षांत आम्ही जो विकास केला, तो करण्यासाठी मागच्या सरकारला कित्येक पिढ्या लागल्या, अशी टीका त्यांनी केली. मोदी यांनी मराठीत भाषणाची सुरूवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संत आणि शुरवीरांची ही पवित्र भूमी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

दरम्यान, विकासकामांचं श्रेय घेण्यावरून शिवसेना व भाजपात तणाव निर्माण झाला. ठाण्यात दोन्ही पक्षांत जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळाली.