नागपूरातील वृद्ध दाम्पत्याच्या खूनाचा उलगडा, दत्तक घेतलेल्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली हत्या

नागपूर | येथे सोमवारी एका वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याचे समोर आले होते. हे दोघं त्यांच्या घरात वेगवेगळ्या खोलीत मृतावस्थेत आढळले होते. आता त्यांच्या खूनाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. वाडी येथील सुरक्षानगरातील शंकर अतुलचंद्र चंपाती (72) आणि त्यांच्या पत्नी सीमा (64) या वृद्ध दाम्पत्याची हत्या झाली होती. आता पोलिसांनी तपास करत या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे. या दाम्पत्याने दत्तक घेतलेल्या मुलीनेच त्यांची हत्या केली. तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 8 तासात हत्येचे गुढ उकलण्यात यश मिळवले.

मालमत्ता हडपण्याच्या हेतूने हत्या

मालमत्ता हडपण्याच्या हेतूने या वृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. या दाम्पत्याने एक मुलगी दत्तक घेतली होती. तिनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. वृद्ध दाम्पत्याच्या दत्तक मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने कट रचून हे निर्घृण हत्याकांड घडवून आले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी चंपाती दाम्पत्याची दत्तक मुलगी ऐश्वर्या (23) आणि तिचा प्रियकर इकलाख (22) या दोघांना अटक केली

सहा महिन्यांची असताना घेतले होते दत्तक

शंकर चंपाती आणि सीमा चंपाती यांनी ऐश्वर्याला सहा महिन्यांची असताना दत्तक घेतले होते. शंकर चंपाती हे निवृत्त अधिकारी आहेत. ते दत्तवाडीतील सुरक्षानगरात राहत होते. या दत्तक मुलीचा त्यांनी पोटच्या पोरीप्रमाणे सांभाळ केला होता. मात्र जिला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावला तिनेच प्रियकराच्या मदतीने या वृद्ध आई-वडिलांचा हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ऐश्वर्यानेच रचला होता बनाव

सोमवारी चंपाती दाम्पत्याची हत्या झाल्याचे समोर आले होते. ऐश्वर्यानेच तशी तक्रार केली होती. ऐश्वर्या कामावरुन घरी जाताच तिने आई-वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. यानंतर तिने पोलिसांना पाचारण केले. मात्र पोलिसांना शंका आली. पोलिसांनी तिची कसून चौकशी करणे सुरू केले. यानंतर तिने प्रियकर इकलाखच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणल्याची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.