भाजपचे बाबासाहेब वाकळे नगरचे नवे महापौर

अहमदनगर | अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले आहेत. तर भाजपच्याच मालणताई ढोणे उपमहापौरपदी विजयी झाल्या. राष्ट्रवादीने भाजपला साथ दिल्याने शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून दूर रहावे लागले.

सभागृहात महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे वाकळे व सेनेचे बाळासाहेब बोराटे असे दोन उमेदवार रिंगणात होते. बाबासाहेब वाकळे यांना 37 इतकी मते मिळाली. त्यात भाजपचे 14, राष्ट्रवादी ची 18, बसपा 04 अपक्ष 01 अशा मतांचा समावेश आहे.  शिवसेनेने या निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे.

अहमदनगरचे नवनिर्वाचित महापौर बाबासाहेब वाकळे

शिवसेनेकडून श्रीपाद छिंदम यांना चोप..

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर चर्चेत आलेले वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज धक्काबुक्की केली. भाजपने छिंदमची हकालपट्टी केल्यानंतर त्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांचे नाव पुकारताच छिंदम याने हात वर करुन शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे चिडलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी छिंदमला धक्काबुक्की केली.