पुण्यातील बेपत्ता RTI कार्यकर्ते विनायक शिरसाट यांची निर्घृण हत्या, ताम्हिणी घाटात आढळला कुजलेला मृतदेह

पुणे | येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे.  शिरसाट यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताम्हिणी घाटात आढळून आला आहे. विनायक शिरसाट हे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होते. विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी तशी तक्रारही दाखल केली होती.

शिरसाट पुण्यातील शिवणे उत्तमनगर परीसरात राहात होते. ते पुणे शहर आरपीआयचे उपाध्यक्ष होते, तसेच समाजसेवक म्हणूनही त्यांची ओळख होती. वडगाव धायरीसह परीसरातील अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवून अनेक कामे त्यांनी बंद पाडली होती. त्या प्रकरणाचा याच्याशी काही संबंध आहे का याचाही शोध घेतला जात आहे. मृतदेह पाहिल्यानंतर खून करून विनायक यांचा मृतदेह दरीत फेकून दिला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय. बेपत्ता असलेल्या विनायक यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनची मदत घेतली. त्यांचे अखेरचे लोकेशन शोधून त्यानुसार त्यांच्या शोध घेण्यात आला त्यानंतर त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.