वानखेडे स्टेडियमवर दहशतवादी हल्ल्याची निव्वळ अफवा, मुंबई पोलिसांकडून खुलासा

मुंबई । आयपीएल खेळाडूंवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती विविध मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली होती. यानंतर अलर्टही जारी करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र या निव्वळ अफवा असल्याचा खुलासा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणेला अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस प्रवक्ता मंजुनाथ सिंगे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

आयपीएल खेळाडूंवर हॉटेल, रस्ते आणि पार्किंगमध्ये हल्ला होऊ शकतो, अशी माहिती एटीएसने पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीत समोर आली असल्याचे बोलले जात होते. दहशतवाद्यांनी ट्रायडंट हॉटेलपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत रेकी केली असेही बोलले जात होते. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सुरक्षा यंत्रणेने हे सर्व वृत्त फेटाळले आहेत.

आयपीएल खेळाडूंवर दहशतवादी हल्ल्याच्या भीतीमुळे त्यांच्या बससोबत एस्कॉर्टसाठी माक्समॅन कॉम्बॅट वाहनाचाही वापर करण्याचे सांगण्यात आले. असे बोलले जात होते. याशिवाय हॉटेल आणि स्टेडियममध्येही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याचे वृत्त होते. मात्र आता ही भीती दूर झाली आहे.