IPL: कॅप्टन कुल धोनीला चिडणे पडले महागात, सामन्यात लागला दंड

एएम स्पोर्टस । आयपीएलच्या 25व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने विजय मिळवला, परंतु कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आचारसंहितेच्या उल्लंघनाचा दोषी ठरला. देशात आचारसंहिता ही निवडणुकीची असो किंवा खेळाची त्याचे उल्लंघन करणे महागातच पडते. जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या कर्णधार धोनीवर आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल सामन्यच्या मानधनाच्या 50 टक्के दंड लावण्यात आला. आयपीएलच्या आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.20 नुसार धोनीने लेव्हल 2 चा अपराध स्वीकारला आहे. अनुच्छेद 2.20 खेळ भावनेच्या विरुद्ध वर्तणुकीशी निगडित आहे.

वास्तविक, भलेमोठे प्रेशर असतानाही बर्फापेक्षाही थंड डोक्याने वागणारा धोनी खूप कमी वेळा चिडलेला पाहायला मिळाला आहे. परंतु, परिस्थितीच अशी झाली होती की, धोनीलाही मैदानावर संताप अनावर झाला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध रोमांचक सामन्यात पंचांनी अखेरच्या ओव्हरमध्ये अशी चूक केली, ज्यामुळे त्यांना धोनीचा संताप पाहायला मिळाला.

सामन्याच्या अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर महेंद्रसिंह धोनी बाद झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला विजयासाठी 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती. धोनी बाद झाल्यानंतर मिशेल सेंटनर फलंदाजीसाठी आला. त्या वेळी राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज बेन स्टोक्स गोलंदाजी करत होता. बेन स्टोक्सने या षटकाचा चौथा चेंडू मिशेल सेंटनरला टाकला यावर त्याने धावून 2 धावा काढल्या.

तेव्हा बेन स्टोक्सच्या या चेंडूला मैदानावरील पंचांनी आधी तर नोबॉल दिला. परंतु या निर्णयाला ताबडतोब परतही घेतले. या निर्णयामुळे धोनी एवढा नाराज झाला की, तो मैदानात आला आणि भरमैदानात पंचांशी हमरीतुमरी केली.

चेन्नईचे म्हणणे होते की, हा चेंडू कमरेच्या वर होता यामुळे याला नोबॉल दिले पाहिजे होते. यामुळे धोनीही मैदानावरील पंचांशी वाद घालायला मैदानावर धावत आला. परंतु पंचांनी निर्णय बदलला नाही. पाचव्या चेंडूवर सेंटनरने दोन धावा काढल्या. अखेरच्या चेंडूवर जिंकण्यासाठी 4 धावांची गरज होती. येथे पुढचा चेंडू वाइड गेला. यामुळे आता अखेरच्या चेंडूवर तीन धावा पाहिजे असताना सेंटनरने षटकार ठोकून चेन्नई सुपरकिंग्जसाठी विजय खेचून आणला.