कौटुंबिक वादातून मायलेकाची आत्महत्या, लातूरातील धक्कादायक घटना

लातूर | कौटुंबिक वादातून मायलेकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील निटूर येथे घडली आहे. आशाबाई सुभाष घोडके (वय 50 वर्षे) आणि नितीन सुभाष घोडके (वय 30 वर्षे) अशी या मायलेकाची नावं आहेत. दोघांनीही एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आशाबाई घोडके व नितीन घोडके दोघेही मोलमजुरी करायचे. शुक्रवारी दुपारी दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात नितीनने राहत्या घरात गळफास घेतला. तर शेताकडे निघून गेलेल्या त्याच्या आईने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.