सपा आणि बसपाच्या युतीमुळे भाजप भयभीत, पक्षाच्या कार्यक्रमांवर आणत आहेत बंदी – मायावतींची भाजप सरकारवर टीका

लखनऊ | योगी सरकारने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची लखनऊ विमानतळावर अडवणूक केल्यामुळे उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर अखिलेश यादव यांनी योगी सरकारचा समाचार घेतला. दरम्यान बसपा अध्यक्ष मायावती यांनीही अखिलेश यांना साथ दिली आहे.

अखिलेश अलाहाबात विद्यापीठातील कार्यक्रमाला जाणार होते. त्यानंतर ते प्रयागराज येथील आखाड्याचे महंत नरेंद्र गिरींची भेट घेणार होते. परंतू सरकारने त्यांना विमानतळावरच अडवले. बसपा अध्यक्षा मायावतींनी ‘उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची लखनऊ विमानतळावरच अडवून ठेवल्याची ही घटना भाजप सरकारच्या हुकुमशाहीचे आणि लोकशाहीच्या हत्येचे प्रतिक आहे.’ असे ट्विट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘भाजपाचे केंद्र आणि राज्यातील सरकार सपा आणि बसपाच्या युतीमुळे एवढे भयभीत झाले आहे की, ते पक्षाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.