अशी ही रणरागिणी, पती शहीद झाल्यानंतर त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी करतेय धडपड

2

औरंगाबाद | अस्तित्वाला फुंकून बनते, लेकरांची ती कणखर आई, दिव्यशक्ती ती, देशभक्ती ती, देशासाठी कुंकू ही देई ! ही कहाणी अशाच एका एका स्त्रीची आहे जिने मुलीची, एका पत्नीची आणि एका आईची भुमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडली. मराठवाड्यातील एकमेव शौर्य चक्र मिळालेले शहीद जवान चंद्रभान पवार हे 2008 साली अतिरेक्यांशी चकमकीत शहीद झाले. त्यानंतर त्यांच्या वीर पत्नी कांता चंद्रभान पवार यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत औरंगाबाद सारख्या शहरात राहून स्वतः फक्त नववी पास असतानाही मुलांना मात्र इंजिनीरिंगच्य शिक्षणापर्यंत पोहोचवले. आज देशाच्या सीमेवर अनेक जवान शहीद होत आहेत या वीर जवानांच्या वीर पत्नींना काय काय संकटांना सामोरे जावे लागत असेल हे कांता पवार यांच्या संघर्षातून पाहायला मिळते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगत आहोत या रणरागिणीच्या संघर्षाची कहाणी.

कांता चंद्रभान पवार यांचे पती चंद्रभान पवार हे देशासाठी कर्तव्य बजावताना शहीद झाले. मात्र कांताबाई आजही त्यांचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे निभावत आहेत. 2008 साली पाच अतिरेक्यांचा खात्मा करून चंद्रभान पवार यांनी प्राणांची आहूती दिली. त्यावेळी त्यांची मुले अवघी 2 आणि 3 वर्षांची होती. कांताबाई या अवघ्या नववी पास आहेत. अशात पती गेल्यानंतर सासर आणि माहेरच्या दोन्ही लोकांकडून कांताबाईंना गावाकडे राहून शेती पाहण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र पती चंद्रभान पवार यांचे मुलांना डिफेन्समध्ये पाठवायचे स्वप्न पूर्ण करणार हा ध्यास त्यांनी घेतला होता. घरच्यांच्या जुन्या विचारांना झुगारून कांताबाई यांनी मुलांसाठी आणि शहीद पतीच्या स्वप्नांसाठी जगायचे ठरवले आणि त्यांचा आयुष्याशी संघर्ष सुरू झाला.

स्वतःला इंग्रजी येत नसली तरी मुलांना त्यांनी इंग्रजी शाळेत पाठवले, शिकवणीला पैसे पुरत नसल्याने कांताबाई यांनी टेलरिंगचा जोडधंदा सुरू केला. शासकीय कामांमध्ये अडथळा येऊ नये, किंवा आपल्या कमी शिक्षणाचा कोणी फायदा घेऊ नये, यासाठी त्यांनी ही घरच्या घरीच शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पती शहीद होऊन दहा वर्षानंतर आज कांताबाई यांची मुले अजय आणि अक्षय इंजिनिअरिंग करत असून डिफेन्ससाठी ची तयारी करत आहेत. “मुलांना डिफेन्समध्ये पाठवणे हीच शहीद चंद्रभान यांना खरी श्रद्धांजली असेल”, असं कांताबाई सांगतात.

देशाच्या संरक्षणासाठी स्वतः चे बलिदान देणाऱ्या जवानांच्या मागेही या वीरपत्नी असतात, म्हणूनच हा देश घडतोय. कारण घडते नवी पिढी… तेच देशभक्तीचे संस्कार… आणि तिच बुलंद इच्छाशक्ती… कायम ठेवणाऱ्या या स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा…