रात्रभर एकत्र असल्याचा जाब विचारल्याने प्रियकराने केली प्रेयसीच्या वडिलांची निर्घृण हत्या

नाशिक । नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे प्रियकराने प्रेयसीच्या पित्याची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी फरार झाला. या घटनेत मृताचा मुलगाही जखमी असून त्याच्यावर नांदगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मांडवड गावात नागेश श्रावण पवार याने शनिवारी (दि.13) रात्री 8.45 वाजता गावातीलच रणजित दामू आहेर यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. रणजित आहेर यांनी नागेशला व त्यांच्या मुलीला एकत्र पाहिल्याने ते रागात होते. याचा जाब त्यांनी नागेशला विचारला. यावर नागेश खरे-खोटे करण्यासाठी चंद्रकला आहेर यांना रणजित यांच्याकडे घेऊन गेला असता रणजित यांनी काहीही विचारपूस न करता नागेशला काठीने मारहाण सुरू केली

वाद वाढत गेल्यावर नागेशने रणजित यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. यात रणजित यांचा जागीच मृत्यू झाला. एवढ्यावरच न थांबता नागेशने रणजित यांचा मुलगा तुषारच्या हातावरही कुऱ्हाडीने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 302, 307 प्रमाणे गुन्हा नोंदवला असून सहायक पोलिस निरीक्षक व्ही. बी. चौगुले पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, रणजित आहेर यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मृताच्या कुटुंबीयांनी घेतल्याने पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी जमली होती.