पाच वर्षात केलेली कामे मुख्यमंत्री जनतेसमोर मांडणार, लोकसभेच्या निकालापूर्वी भाजपची विधानसभेची तयारी सुरू

27

मुंबई | लोकसभा निवडणुकांच्या सातही टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता 23 मे रोजी लागणाऱ्या निकालांची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. निवडणुकांच्या एक्झिट पोलही आलेल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवरील निकाल काय लागतील याबाबतचा आढावा घेण्यासाठी भाजपने आज बैठक बोलवली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची आखणी केली जाणार आहे. भाजपच्या राज्यस्तरीय निवडणूक आढावा दादर येथील वसंत स्मृती भाजप कार्यालयात बैठकीला सुरुवात झाली आहे.

विकास यात्रा काढणार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री राज्यभरात विकास यात्रा काढणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या विकासकामांची ब्लु प्रिंट घेऊन जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाध्यक्षांकडून निवडणूकीची कामगिरी आणि दुष्काळ स्थितीबाबत अहवाल मागवण्यात आले आहेत

दुष्काळाचा आढावा

तसेच राज्यभरात सध्या दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. खेड्यांमध्ये तर महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंतीकरावी लागतेय. जीवार खेळून विहिरीतून पाणी काढले जात आहेत. अनेक ठिकाणांच्या विहिरीही आटल्या आहेत. यामुळे या बैठकीमध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा देखील घेतला जाणार आहे. त्याप्रमाणे सुचना देखील केल्या जाणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मार्च 2016 -17 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करून मोठा दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

सहा महिन्यांचा कार्यक्रम निश्चित

यासोबतच आजच्या या बैठकीत पुढील सहा महिन्यांतील पक्षाचा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. पक्षाची भूमिका यामध्ये स्पष्ट होईल. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आदी नेते देखील या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे.