अशी होती माधुरी आणि श्रीदेवींची अखेरची भेट, माधुरीने स्वतः दिला आठवणींना उजाळा

मुंबई. अभिनेत्री माधुरी दीक्षितने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा दिला. पहिल्या महिला सुपरस्टार श्रीदेवींनी गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जगाचा निरोप घेतला. पण आजही अनेकांच्या मनात त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘टोटल धमाल’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका ठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली असताना माधुरीने श्रीदेवींसोबतच्या शेवटच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. श्रीदेवींच्या आठवणीत माधुरी यावेळी भावूक झाली.

माधुरीने सांगितले की, ‘मनीष मल्होत्राच्या बर्थडे पार्टीत आम्ही अखेरच्या वेळी भेटलो. श्रीदेवी त्यांच्या मुली खुशी कपूर आणि जान्हवी कपूरसोबत आल्या होत्या. त्या खुप आनंदी होत्या. आपले आयुष्य हे खुप लहान आहे हे श्रीदेवींच्या अचानक जाण्यावरुन कळते. यामुळे आपण प्रत्येक दिवस मनापासून जगावा.’

माधुरी म्हणाली की, ‘आपल्या कुटूंबीयांना आणि मुलांना वेळ द्या. उद्या काय होईल हे सांगता येत नाही. श्रीदेवींच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.’

24 फेब्रुवरी 2018 मध्ये श्रीदेवींनी अचानक जगाचा निरोप घेतला. दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता.