पंतप्रधान मोदी-नितीश कुमार यांचं प्रेम लैला-मजनूपेक्षाही मजबूत – ओवैसी

एएम न्यूज नेटवर्क । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या युतीवर टीकास्त्र सोडत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी त्यांची तुलना लैला-मजनूच्या जोडीशी केली आहे. “नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील प्रेम हे खूप मजबूत आहे. हे प्रेम लैला-मजनूच्या प्रेमापेक्षाही मजबूत आहे. जेव्हा-केव्हा नितीश-मोदींची लव्ह स्टोरी लिहिली जाईल तेव्हा त्यातील लैला कोण आणि मजनू कोण हे मला विचारू नका, तुम्हीच ठरवा,” अशा शब्दांत ओवैसींनी निवडणूक प्रचारसभेत मोदी-नितीश यांच्यावर टीका केली.

ओवैसी पुढे म्हणाले की, “या प्रेमकहाणीत द्वेषही आवर्जून लिहिला जाईल. कारण भारतात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव आहे.” 2015 विधानसभा निवडणुकांमध्ये नितीश यांच्या नेतृत्वात जदयूने काँग्रेस आणि राजदशी युती केली. परंतु नंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. बिहारमधील 40 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप आणि जदयू प्रत्येकी 17 जागांवर उमेदवार दिले आहेत, तर उर्वरित सहा जागांवर लोजपाचे उमेदवार आहेत.

ओवैसींनी केंद्रीय मंत्री मनेका गांधींवरही त्यांच्या मुस्लिम मतदारांवरील विधानामुळे निशाण साधला. यावेळी त्यांनी भाजपची ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणा फसवी असल्याचे म्हटले. ओवैसी म्हणाले, “मनेका गांधींनी मुस्लिमांना धमकी दिली की, जर त्यांनी मतदान केले नाही, तर त्यांना रोजगार मिळणार नाही. पंतप्रधानांची सबका साथ सबका विकास ही घोषणा खोटी असल्याचे यावरून सिद्ध होते.”

सुलतानपूरच्या सभेत मनेका गांधी मुस्लिम मतदारांना उद्देशून म्हणाल्या होत्या की, “तुम्ही लक्षात ठेवा की, तुमच्यासोबत किंवा तुमच्याशिवाय हा विजय निश्चितच आहे. परंतु जर तुम्ही मतदान केले नाही, आणि पुन्हा एखाद्या कामासाठी आमच्याकडे आलात तर… निवडणुकीत जर भाजपला सोडून इतर पक्षाला मतदान केले तर त्याचे आम्हाला दु:ख होईल.”

एमआयएमने त्यांचे बिहार प्रमुख अख्तरुल इमाम यांना मुस्लिम वर्चस्व असलेल्या किसानगंज लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे.