“राष्ट्रवादीत कौटुंबिक कलह, पवारांची पुतण्यानेच काढली विकेट!”, वर्ध्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

वर्धा । भाजप, शिवसेना, रिपाइं (आठवले) व लोजपा या महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यामध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. शहरच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर सकाळी 11.30 वाजता ते सभेला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 4 टप्प्यात होत असून दि. 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी विविध ठिकाणी मतदान होणार आहे.

Live Updates

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्वनेतेमंडळींचा उल्लेख देशाचे चौकीदार असा केला.
– देशाचे प्रधान चौकीदार मोदींचं वर्ध्यांच्या भूमीवर स्वागत.
– गांधीजींचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही मोदीजींची सभा वर्ध्यात घेतली. कारण गांधीजी म्हणाले होते- काँग्रेस विसर्जित करा. आणि वर्ध्यातील जनतेने काँग्रेस विसर्जित करून दाखवली.
– मुख्यमंत्रिपदाची संधी विदर्भपुत्राला दिल्याबद्दल मोदींचे आभार.
– काही देशांमध्ये 1 एप्रिल हा एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. पण या देशात एका पक्षानं 50 वर्षे जनतेला एप्रिल फूल केलं.
– मोदींना हरवण्यासाठी काँग्रेसने 56 पक्षांची आघाडी केली. पण देश चालवण्यासाठी 56 पक्ष नव्हे तर 56 इंची छाती लागते.

पंतप्रधान मोदी

– मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात. महात्मा गांधी व विनोबा भावेंच्या स्मृतींना अभिवादन करत भाषणाला सुरुवात.
– देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून मोदी म्हणाले की, इस्रोने काही वेळापूर्वीच एक मोठे ऐतिहासिक यश मिळवले आहे. इस्रोने 5 देशांच्या दोन डझनांहून जास्त उपग्रह अंतराळात स्थापित केले.
– सामान्य नागरिकांनाही उपग्रहाचं प्रक्षेपण पाहण्याची आता सोय झाली आहे. याचा आजच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.
– जे एअर कंडिशनमध्ये बसून सल्ला देताहेत, त्यांना 40-42 डिग्री तापमानात बसून जनसागर आम्हाला आशीर्वाद देणार असल्याचे माहिती नाही.
– गांधी-विनोबाजींचा स्वच्छतेचा आग्रह तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसने त्यांच्या गोष्टींचे किती अनुकरण केले, हेही तुम्हाला माहिती आहे.
– काँग्रेसने स्वच्छतेच्या कामात गुंतलेल्या तमाम चौकीदारांचा अपमान केला.
– काँग्रेस नेता म्हणतो की, मोदींनी फक्त शौचालयाची चौकीदारी केली. पण मी तुमची ही शिवी माझ्यासाठी दागिना आहे.
– कारण शौचालयाची चौकीदारी करून मला माझ्या माताभगिनींचे आशीर्वाद लाभले.
– काँग्रेसने काम, श्रमाचा अपमान केला. या जातिवादी लोकांना निवडणुकीत धडा मिळेल.
– शरद पवार देशातील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते कोणतेही काम विचार न करता करत नाहीत. एक काळ होता की, ते पंतप्रधानपदाचा विचार करत होते. त्यांनी याची घोषणाही केली. पण अचानक एका दिवशी त्यांनी माघार घेतली. त्यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केले. त्यांनाही माहिती आहे की, वारं कुणीकडं वाहतंय.
– या वेळी देशाच्या जनतेनं भल्याभल्यांना मतदानाआधीच पळून जायला भाग पाडलं.
– राष्ट्रवादीत कौटुंबिक कलह सुरू आहे. पक्ष त्यांच्या हातातून निसटत आहे. यामुळेच राष्ट्रवादीला तिकीट वाटपात अडचणी येत आहे.
– महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. सहा महिन्यांतून कोणीही एखादा उठतो आणि भ्रष्टाचाराचा पैसा खाऊन पुन्हा झोपी जातो. सिंचन, स्टॅम्प, रस्ते अशा अनेक घोटाळ्यांचा इतिहास आहे.
– अजित पवार धरणातील पाण्याबाबत शेतकऱ्यांना जे म्हणाले ते कोणीही विसरू शकत नाही. मावळमधील शेतकरी जेव्हा हक्कासाठी लढत होते तेव्हा पवार कुटुंबाने त्यांच्या गोळीबाराचे आदेश दिले.
– पवारांच्या काळ्यात कित्येक शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी मजबूर व्हावे लागले. त्यांनी कोणाचीही काळजी केली नाही.
– त्याच्या खोट्या आश्वासनांची पोलखोल झालेली आहे. ते स्वत: पुतण्याच्या हातून क्लीन बोल्ड झाले आहेत.
– विदर्भातील दुष्काळ हा काँग्रेसच्या सत्तर वर्षातील घोटाळ्याची देण आहे.
– काँग्रेस आपल्या जवानांना अपमानिक करण्याचीही काम करत आहेत. भारतीय जवानांनी तर हे लोक पुरावे मागत आहेत. पूर्ण जग भारताच्या बाजूने आहे. मात्र काँग्रेस आणि त्यांचे सोबती अशा काही गोष्टी बोलत आहेत. ज्या पाकिस्तानला चांगल्या वाटतात.
– तुम्हाला पुरावे हवे आहे की, देशाचे शौर्य हवे आहे. देशाच्या सैन्यावर संशय घेणाऱ्यांना धडा शिकवणार का? असा प्रश्नही नरेंद्र मोदींनी विचारला.
– आझाद मैदानातील हल्लेखोर काँग्रेसमुळेच सुटले.
– हिंदू आतंकवाद हा शब्द काँग्रेसमुळेच आला. इंग्रजांनीही कधी हिंदूंना आतंकवाद म्हटले नाही.
– याच महाराष्ट्राच्या धरतीवरुन सुशील कुमार शिंदे भारत सरकारमध्ये होते, तेव्हा त्यांनी हिंदू आतंकवाद या शब्दाची चर्चा केली आहे.
– मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस आणि एनसीपी कोणत्याही थराला जाऊ शकतात.
– काँग्रेसने हिंदूंना अपमानित करण्याचे जे पाप केले आहे. देशाची मुळधारा कलंकीत करण्याचा प्रयत्न केला आहे. कोट्यावधी देशवासियांना जगभरात कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. अशा काँग्रेसला तुम्ही माफ करु शकता का असा सवालही मोदींनी जनतेला विचारला.
– काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी त्यांना या पापांमधून मुक्ती मिळू शकत नाही.
– देशाने काँग्रेसला शिक्षा देण्याची तयारी केली आहे. हे काँग्रेसनेही मान्य केले आहे. यामुळे आता काँग्रेस नेता मैदान सोडून पळत आहेत.
– गोष्ट आतंकवाद्याची असेल किंवा कोणतीही असो आमच्या सरकारने कठोर पावलं उचलली आहे. दहशतवादही कमी होत आहे.
– काँग्रेसचा इतिहास गरीब आणि दलितांचा विरोधी राहिला आहे. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. आता ते फक्त मजबूरी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात. काँग्रेस फक्त कुटुंबापुढे पाय टेकते.
– विदर्भाचा विकास होत आहे. विकासाचे हे अभियान नवीन भारताचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून मला तुमची गरज आहे.
– यावेळी महाराष्ट्रात शंभर टक्के विजय मिळाला पाहिजे. एनसीपी आणि काँग्रेसच्या सोबतींना एकही सीट मिळू नये ही कमाल महाराष्ट्रातील लोकांनी करायला हवी.

 

 

वर्ध्यानंतर पंतप्रधान राजामुंदरी आणि सिकंदराबादेत जनसभेला संबोधित करतील. पीएम मोदी महाराष्ट्रात एकूण आठ सभा घेणार आहेत. याशिवाय भाजपच्या राज्यभरात एकूण एक हजार सभा होण्याची शक्यता आहे.

महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात लोकसभा जागेवर सध्या भाजपचा ताबा आहे. परंतु येथे उलटफेर नेहमीच होत असल्याने ही जागा बुचकळ्यात टाकणारी आहे. येथे अनेकदा जिंकणाऱ्या उमेदवाराचाही पराभव झालेला आहे.