घर मातीचंच पण जिद्द काँक्रीटपेक्षाही भक्कम, अंगणवाडी सेविकेचा मुलगा बनला फौजदार!

कोल्हापूर | घर मातीचं असलं तरी तिची जिद्द सिमेंट काँक्रीट पेक्षाही भक्कम होती. तिला आपल्या मुलाला गावातला पहिला फौजदार बनवायचं होतं आणि तिने बनवलं. पाचवीला पुजलेला संघर्ष, अफाट इच्छाशक्ती आणि याला तिच्या मुलाच्या जिद्दीची मिळालेली साथ यातून एका मातेनं घडवला तिच्या गावातला पहिला फौजदार. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सुमारे 2500 लोकसंख्या असणाऱ्या येळावडे या गावतील अंगणवाडी सेविका असणाऱ्या श्रीमती सुवर्णा तानाजी सारंग या महिलेच्या आणि तिच्या मुलाची आज राधानागरीच्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे.

सुवर्णा तानाजी सारंग यांचा वयाच्या 15 व्या वर्षीच येळावडे येथील तानाजी दिनकर सारंग यांच्याबरोबर विवाह झाला होता. तानाजी सारंग हे मुंबई येथे नोकरीला होते. सुवर्णा सारंग या गावातच आपल्या सासू सासऱ्यांबरोबर मोलमजुरी करत होत्या. सन 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटात मरण पावलेल्या लोकांची प्रेतं बघून तानाजी सारंग यांना मोठा धक्का बसला. या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत. ते नोकरी सोडून आपल्या गावी परत आले. अवघ्या काही दिवसातच तानाजी सारंग यांचा मृत्यू झाला. यावेळी सुवर्णा आणि तानाजी सारंग यांचा मुलगा तुषार अवघा एक वर्षाचा होता. सुवर्णा सारंग यांचे यावेळी वय अवघे 16 ते 17 होतं. ऐन तारुण्यात आणि वर्षाचं पोर पदरात असतानाच पती गेल्याने सुवर्णा सारंग यांचं आयुष्य संघर्षमय बनलं. सासू सासरे, लहान मुल यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. पण त्यांनी जिद्द हरली नाही. गावातील लोकांच्या शेतात मोलमजुरी करून त्यांनी आपल्या संसाराचा गाडा सुरूच ठेवला. आपल्या बहिणीची अवस्था पाहून त्यांच्या भावाने तुषारला गंगापूर(ता.भुदरगड) येथील आपल्या घरी नेले. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी तुषारच्या मामानेच उचलली. सन 2001 साली सुवर्णा सारंग यांना गावातच अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यावेळी तुषार फक्त 9 वर्षाचा होता. याचवेळी सुवर्णा सारंग यांनी आपल्या मुलाला मोठा अधिकारी करण्याचं स्वप्न पाहिलं. या स्वप्नाला तुषारने त्याच्या मेहनतीची आणि चिकटीची किनार लावली आणि आपल्या मातेच्या संघर्षाचं आणि आपल्या मामाच्या विश्वासाचं चीज केलं आणि तो आपल्या गावातला पहिला फौजदार बनला. आज त्याच्या गावाबरोबर पंचक्रोशीतील लोकसुद्धा त्याचं आणि त्याच्या आईचं कौतुक करत आहेत.