राफेलवरून अंबानींवर हल्लाबोल करणारे सिब्बल कोर्टात करताहेत त्यांचीच वकिली, सोशलवर ट्रोलिंग

नवी दिल्ली | काँग्रेस नेते कपिल सिब्बल सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. सिब्बल देशातील श्रीमंत व्यक्ती अनिल अंबानी यांची केस सुप्रीम कोर्टात लढत आहेत. तर दूसरीकडे राफेल मुद्द्यावरून ट्विटर आणि लोकांसमोर त्यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या या विरोधाभासी कृतींमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी कपिल सिब्बल अनिल अंबानींसाठी सुप्रीम कोर्टात दाखल झाले. कोर्टाचा अवमान केल्याबद्दल अनिल अंबानींवर खटला सुरु आहे. आपले पैसे परत मिळावे यासाठी एरिक्सन इंडियाने सुप्रीम कोर्टात अनिल अंबानींविरुद्ध केस दाखल केली. कंपनीचे म्हणणे आहे की, अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन्सने पैसे न फेडताच स्वतःला दिवाळखोरं घोषित केले. असे करणे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करण्यासारखं आहे. या केसच्या सुनावणीसाठी सिब्बत कोर्टात आले होते.

एकीकडे अंबानींवर आरोप आणि दूसरीकडे सुप्रीम कोर्टात त्यांचे कौतुक करणे यामुळे सोशल मीडियावर अनेक युझर्सनी कपिल सिब्बल यांची टिंगल उडवली आहे. एका युझरने लिहिले की, ‘कपिल सिब्बल ग्रँड लाइफ जगतात. सुप्रीम कोर्टातील केस लढण्यासाठी अनिल अंबानींकडून भरघोस पैसे घेतात आणि लोकांसमोर अनिल अंबानींवर हल्लाबोल करत ते काँग्रेससाठी योगदान देत आहेत.’

तर दूसरीकडे ‘मी राफेल आणि इतर मुद्दे येण्याआधी पासून अंबानींची वकिली करत असल्याचे सिब्बल यांनी आपल्या बचावात सांगितले.