‘प्रकाश आंबेडकर जातिवाद बळकट करण्याचे काम करताहेत’, रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडेंची सडकून टीका

3

अहमदनगर | रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर जातिवाद बळकट करण्याचे काम करत आहेत, असे जोगेंद्र कवाडे म्हणाले. जातिवाद टाळण्यासाठी उपाय सुचवणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांच्या नावांपुढे जात का लिहिली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे बोलत होते.

भारिप बहुजन महासंघ जातिअंताचे आंदोलन करत आहे. मग या आंदोलनाला दफन करून पुन्हा जातिवाद पेरण्याचे काम त्यांनी का करावे? जातिवाद टाळण्यासाठी उपाय सुचवणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांच्या नावापुढे जात का लिहिली? हा केवढा मोठा विरोधाभास आहे. यासोबतच जातीप्रथा बळकट करण्याचा अट्टहास प्रकाश आंबेडकरांनी टाळायला हवा, असा सल्लाही जोगेंद्र कवाडे यांनी दिला.

जोगेंद्र कवाडे पुढे म्हणाले की, रामदास आठवले हे धर्मनिरपेक्ष नव्हते. तर ते भाजपमध्ये गेले. त्यांना डिलीट करून टाका. तसेच बहुजन वंचित आघाडी ही महाआघाडीत विलीन करा आणि प्रकाश आंबेडकरांनी या महाआघाडीचे नेतृत्त्व करावे, अशी ऑफरही त्यांनी या वेळी प्रकाश आंबेडकरांना दिली.

वंचित बहुजन आघाडीने नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या 37 उमेदवारांच्या नावांच्या यादीत त्यांच्या नावासमोर जातीचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधलाय.