झारखंडमध्ये चकमकीत तीन नक्षली ठार, तर एक जवान शहीद

नवी दिल्ली | झारखंडच्या गिरिहीड जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुरक्षारक्षक आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तर सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. देवरी परिसरातील घरपहरी जंगलात ही चकमक झाली. सीआरपीएफचे आयजी संजय लाटकर यांनी सांगितले की, चकमक आता संपली आहे. या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे जवळपास 4 वाजता काही सुरक्षारक्षक सर्च अभियानासाठी निघाले होते. सीआरपीएफच्या 7 बटालियनने बेलभा घाट सर्च ऑपरेशन सुरू केले. यादरम्यान जंगलात लपलेल्या नक्षल्यांनी सुरक्षारक्षकांवर फायरिंग सुरू केली. सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन नक्षल्यांंचे मृतदेह मिळाले आहेत. यावेळी एके-47, तीन मॅगजीन्स, चार बॉम्ब जप्त करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत अशा घटना घडत आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नक्षल्यांकडून कारवाया केल्या जात आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीगडमध्येही भाजपच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. यामध्ये एका भाजप आमदाराचा मृत्यू झाला होता.