जेजुरीच्या खंडोबाचा नवस, कुत्र्यासाठी घातले जागरण गोंधळ

173

पुणे | लाडक्या कुत्र्याची आजारपणातून लवकर सुटका व्हावी यासाठी पुण्यातील एका कुटुंबाने चक्क जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला आहे. एरवी एखाद्या कुटुंबामध्ये लग्नकार्य असेल तर जागरण गोंधळ घालण्याची परंपरा खूप वर्षांपासून आहे. पण एखाद्या कुत्र्यासाठी घातलेला हा जागरण गोंधळ चर्चेचा विषय ठरत आहे.

पुण्यातील धनकवडी परिसरात राहणारे नाना जाधव यांच्याकडे दोन वर्षे वयाचा रॉटविलर जातीचा कुत्रा आहे. त्याचे ब्रुनो असे नाव आहे. या कुत्र्याला गॅस्ट्रो झाल्याने त्याला काही खातापिता येत नव्हते. जाधव यांच्याकडे यापूर्वीही रॉटविलर जातीचा कुत्रा होता. पण तो दहा महिन्याचा असताना त्याला गॅस्ट्रो झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. परंतु मुलीला ब्रुनोचा लळा लागल्यामुळे त्यांनी तसाच कुत्रा आणला. परंतु, त्यालाही गॅस्ट्रो झाला आणि आठ दिवस काहीही न खतापिता तो सलाईनवर होता.

तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना खंडोबाला नवस करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जाधव यांनी जेजुरीच्या खंडोबाला ब्रुनो जर या आजारातून जगला तर जागरण गोंधळ घालू असा नवस केला. त्यानंतर, ब्रुनो आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्यांनी बकरे कापून लोकांना जेवू घातले आणि जागरण गोंधळ घालून नवस पूर्ण केला. यासाठी त्यांनी सोलापूर येथील प्रसिद्ध गोंधळी अंकू-पंकू यांना बोलावून अगदी थाटात हा नवस पूर्ण केला. या आगळ्या वेगळ्या जागरण गोंधळाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.