जालन्याचा तिढा मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंंनी सोडवला, खोतकरांनी माघार घेतल्याने दानवेंचा मार्ग सुकर

2

औरंगाबाद – जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही असलेले अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून माघार घेतली. औरंगाबादेत कार्यकर्ता मेळाव्याच्या आधी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे व स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होती. औरंगाबादेत झालेल्या युतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात होणार आहे.

सूत्रांनुसार, खोतकर-दानवे यांच्यात दिलजमाई झाली असून थोड्याच वेळात कार्यकर्ता मेळाव्यातून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री जालना लोकसभेच्या उमेदवारीबाबत घोषणा करणार आहेत.

काय म्हणाले खोतकर?

माध्यमांशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, आम्हाला दोघांनी युतीचा धर्म शिकवला. काय बोलावं हेच कळत नाही. मागचा तासभर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी आणि दानवे साहेब बसलो होतो. मधल्या काळात जालन्यात आणीबाणी लागली होती, मात्र आज ती उठली आहे. दानवे तुम्ही पुढच्या परीक्षेत पास व्हा. मी कधीच पक्षनिर्णयाच्या विरोधात गेलो नाही. दगाफटका आमच्या स्वभावात नाही; पण आम्हालाही सोबत राहू द्या दानवे साहेब. शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी पार पाडू. आजपासून युतीच्या कामाला लागणार. तुम्हाला रान मोकळो करतो, असे म्हणत अखेर खोतकर यांनी माघार घेतली आहे.

तत्पूर्वी, काल मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही खोतकर उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे दिसून आले. यामुळेच औरंगाबादेत पुन्हा एकदा बैठकीचे आयोजन करण्यात आले. खोतकर यांची मनधरणी करण्यात आणि रावसाहेब दानवे यांचा मार्ग सुकर करण्यात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना यश मिळाले आहे. बैठकीनंतर युतीसाठी काम करू व जास्तीत जास्त जागा जिंकू असा विश्वास उभय पक्षांतील नेत्यांनी व्यक्त केला.