डॉ. कुणाल कामठे यांच्या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

पुणे | पुण्यातल्या डॉ. कामठे पाईल्स क्लिनिकची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्यात आली आहे. सलग 11 तास 5 मिनिटे आयुर्वेदिक पद्धतीने क्षारकर्म आणि क्षारसूत्राने डॉ. कामठे आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. या अनोख्या उपचारांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली आहे. वैद्यकिय क्षेत्रात अशापद्धतीचे विक्रम दुर्मिळ असल्याने डॉ. कामठे यांच्यावर सर्वच क्षेत्रांतून कौतूक करण्यात येत आहे.

मूळव्याधासारख्या दूर्धर आजाराविषयी जनजागृती होण्यासाठी आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होण्यासाठी अशाप्रकारचे सामाजिक हिताचे उपक्रम होणे गरजेचे असल्याचं मत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या डॉ. दिलीप माने यांनी यावेळी व्यक्त केलं.

डॉ. कुणाल कामठे म्हणाले, मूळव्याध, फिशर, भगंदर हे आजार अनेकदा दुर्लक्षित केले जातात. त्यांच्याविषयी समाजात अनेक गैरसमज असल्यानं रुग्ण उपचार घेण्यास लाजतात. त्यामुळं हे गैरसमज दूर होऊन जनजागृती व्हावी आणि रुग्णांना योग्य उपचार मिळावेत. हा या शिबिराचा हेतू होता. आमच्या मूळव्याध मुक्त भारत मिशनची ही खरी सुरुवात होती.