जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत ‘सुपरमॉम’ मेरी कोम अव्वल

नवी दिल्ली | 3 मुलांची आई असलेली ‘सुपरमॉम’मेरी कोमने भारतीयांना अभिमान वाटावा अशी आणखी एक कामगिरी केली आहे. जागितक बॉक्सिंग क्रमवारीत (AIBA) मेरी कोमने अव्वल स्थान पटकावले आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमने 48 किलो वजनी गटात विजेतेपद मिळवले होते. या विजेतेपदाबरोबर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम तिने केला होता.

या अजिंक्य पदाबरोबरच राष्ट्रकुल स्पर्धा आणि पोलंडमधील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा अशा दोनही स्पर्धांमध्ये मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले होते. या कामगिरीच्या जोरावर नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग क्रमवारीत 48 किलो वजनी गटात 700 गुणांसह मेरी कोम ‘नंबर वन’ ठरली आहे. मात्र 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी मेरी कोमला 51 किलो वजनी गटातून खेळावे लागणार आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये 48 किलो वजनी गटाचा समावेश नाही.