भारताने इतिहास रचला, कसोटीपाठोपाठ वनडे मालिकाही जिंकली

टीम इंडियाचा मेलबर्नमध्ये ऐतिहासिक विजय

मेलबर्न | कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वन डे मालिकेतही इतिहास घडवला आहे. मेलबर्नमधील तिसरा वन डे सामना भारताने 7 विकेट्स राखून जिंकला. वन डे मालिकेत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत नमवण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे.

सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी उतरलेला ऑस्ट्रेलिया संघ भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे 230 धावातच गारद झाला.  युजवेंद्र चहलने फिरकीचा मारा करत सहा खेळाडूंना तंबूत पाठवले. तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी दोन विकेट पटकावल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरेल्या भारतीय संघाची खराब सुरूवात झाली. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीने संयमी खेळी करून भारताचा डाव सावरला. विराट बाद झाल्यानतंर केदार जाधवने धोनीला उत्तम साथ देत अर्धशतक झळकावले आणि धोनीने पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावत नाबाद 87 धावांची खेळी केली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला आणि भारताला वन डे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला.