न्यूझीलंडची भारतावर 8 गडी राखून मात

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव

हॅमिल्टन | सलग 3 सामने जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला चौथ्या वनडे सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हॅमिल्टन वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून मात केलीय. सुरुवातीचे 3 सामने गमावल्यानंतर यजमान न्यूझीलंडने मालिकेतील पहिला विजय नोंदवलाय. सुरूवातीला फलंदाजी करण्यासाठी उतरलेला भारतीय संघ अवघ्या 92 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली. यामध्ये ट्रेंट बोल्टने 21 धावा देताना पाच विकेट घेतल्या. तर, कॉलीन डी ग्रँडहोमने 26 धावा देत तीन विकेट घेतल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतानं दिलेलं आव्हान सहज पूर्ण केलं. या विजयासह न्यूझीलंडनं भारताचं मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचं स्वप्न धुळीस मिळवलंय. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत खेळणारा भारतीय संघ आजच्या सामन्यात पुरता उघडा पडला.