पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव, न्यूझीलंडने 80 धावांनी सामना जिंकला

टी-20 मालिकेत न्यूझीलंडची 1-0 ने आघाडी

वेलिंग्टन | न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने दिलेलं 220 धावांचं आव्हान पार करताना भारताचा डाव कोलमडला. 19.2 षटकात भारतीय संघ फक्त 139 धावांपर्यंत मजल मारु शकला. कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज अपयशी ठरले. शिखर धवन, विजय शंकर आणि महेंद्रसिंह धोनी यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. शेवटी 80 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. न्यूझीलंडकडून टीम साऊथी यानं सर्वाधिक 3 बळी घेतले.