‘बहुजन वंचित आघाडी’ स्वबळावर निवडणुक लढवणार, इम्तियाज जलील यांची घोषणा

औरंगाबाद | ‘बहुजन वंचित आघाडी’ स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राज्यात लोकसभेच्या 8 जागा लढवणार, अशी घोषणा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केलीये. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते.

जलील म्हणाले, ‘बहुजन वंचित आघाडीला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहोत. त्यादृष्टीने विविध मतदारसंघात चाचपणी सुरू आहे. राज्यात सात ते आठ जागांवर सक्षमपणे निवडणूक लढवू शकू अस चित्र आहे.’

यावेळी जलील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘एमआयएमला सोडण्यास अॅड. प्रकाश आंबेडकर तयार असतील, तर त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत’, अशा प्रकारच विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलयं. याकडे जलील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना राजकारणात काहीच महत्त्व नाही. माजी मुख्यमंत्री एवढीच त्यांची ओळख आहे. त्यांनी औरंगाबादमधून निवडणूकीला उभे राहून दाखवावे. एखाद्या वॉर्डातून नगरसेवक म्हणून देखील ते निवडून येणार नाहीत.’

‘ज्यावेळी काँग्रेसला एमआयएमच्या मदतीची गरज होती त्यावेळी काँग्रेसचे नेते ओवेसी यांच्याकडे धावतपळत यायचे. एमआयएम नको होती तर त्यावेळी त्यांनी एमआयएमकडे याचना का केली,’ असा सवाल त्यांनी केला.