इम्रान खान एवढे उदार, शांततावादी आहेत तर मसूद अझहरला भारताच्या हवाली करा : सुषमा स्वराज

2

नवी दिल्ली | परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की जर पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई करायची नाही तर त्यांच्यासोबत काहीच चर्चा होऊ शकत नाही. सुषमा स्वराज म्हणाल्या की, इम्रान खान एवढे उदार आणि शांततावादी असतील तर त्यांनी मसूज अझहरला भारताच्या हवाली करावे. ‘भारतीय जग: मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण’ या कार्यक्रमात त्या बुधवारी बोलत होत्या.

सुषमा स्वराज म्हणाल्या की, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. आम्हाला दहशतवादावर चर्चा नकोय, आम्हाला यावर कारवाई हवी आहे. सुषमा स्वराज म्हणाल्या की, तुमच्या धरतीवर असणा-या जैश-ए-मोहम्मत या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ला घडवला आणि काही मिनिटांमध्येच हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली. मात्र, तुमचे विदेश मंत्री म्हणतात की, मसूद पाकिस्तानातच आहे आणि आमच्या माहितीनुसार तो एवढा आजारी आहे की, तो घराबाहेरही पडू शकत नाही. मात्र काही दिवसांनंतर तुमच्या लष्कराचे प्रवक्ता म्हणतात की, मसूद अझहर तर पाकिस्तानात नाहीच.

तुम्ही दहशतवाद्यांविरोधी कारवाई करा. यानंतरच भारत पाकिस्तान संबंध सुधारू शकतात असेही त्या म्हणाल्या. सुषमा स्वराज यांनी यावेळी पाकिस्तानव काही प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, भारतीय हवाई दलाने फक्त दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. एकाही सामान्य नागरिकाला किंवा लष्कराला हानी होऊ नये असे ठरवून हा हल्ला केलेला होता. यामध्ये तुमचं तर कुणीही मारले गेलं नाही मग तुम्ही प्रतिहल्ला का केला. तुम्ही जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडून लढायला आला होता का? असा सवालही सुषमा स्वराज यांनी उपस्थित केला.