पूल दुर्घटनेनंतर टीकेची झोड, आव्हाड म्हणाले- बेशरमांनी माफी मागावी, नितेश राणेंचा पेंग्विनवरून टोमणा

1

मुंबई | सीएसएमटी स्थानकाजवळील फूट ओव्हरब्रीजचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठवली जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावरून सडकून टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तर बेशरम प्रवक्त्यांनी मुंबईकरांची माफी मागावी असे ट्विट केले आहे.

जितेंद्र आव्हाडांची खरमरीत टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी शिवसेना आणि भाजपवर खरमरीत टीका केली आहे. पूल कोसळण्याची जबाबदारी पादचाऱ्यांवर आहे असे वक्तव्य करणाऱ्या बेशरम प्रवक्त्यांनी आणि भाजपने मुंबईकरांची माफी मागावी असे आव्हाड म्हणाले. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नितेश राणेंच्या पेंग्विनवरून टोमणा

आमदार नितेश राणे यांनीही या प्रकरणी टीका केली. पेंग्विनच्या मुद्द्यावरून टोमणा मारताना राणे म्हणाले की, ‘पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा आणि नाइट लाइफसाठी झगडण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली महापालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही ?’

ऑडिट झाले असते तर दुर्घटना टळली असती

एल्फिन्स्टनची दुर्घटना झाल्यानंतर मुंबईतील सर्व पूलांचे ऑडिट का केले गेले नाही? या घटनेला कोण जबाबदार आहे? भावनिक राजकारण करत बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी. पूलाचे ऑडिट झाले असते तर आज लोकांचा नाहक बळी गेला नसता, असे धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.