Good News: ‘या वर्षी सर्वत्र जोरदार पाऊस’, गोदड महाराज संवत्सरीचे पारंपरिक भाकीत ऐकण्यासाठी अलोट गर्दी

अहमदनगर (गणेश जेवरे) । या वर्षी अल निनोचा प्रभाव जाणवणार नसून चांगला पाऊस पडणार आहे, मात्र रोगराई, चोऱ्यांचा सुळसुळाट व महागाईमुळे जनता त्रस्त होईल. तसेच आग लागण्याच्या घटना घडतील, तर राजकीय नेत्यांमध्ये अस्थिर वातावरण राहील. यामुळे ते सतत अस्वस्थ राहतील, असे भाकीत गोदड महाराज यांच्या बाडामध्ये (संवत्सरी) मध्ये वर्तवण्यात आले आहे. यंदा पावसाचे काय होणार याची प्रचंड उत्सुकता होती. पाऊस चांगला आहे, असे सांगताच उपस्थित हजारो नागरिक व भाविकांचे चेहरे आंनदी झाले होते.

भाकितामध्ये 60 वर्षांची संवत्सरी!

कर्जतचे ग्रामदैवत व थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांनी पडणारा पाऊस, पिकांची परिस्थिती, राजकीय व इतर सर्व बाबींवर 60 वर्षांची संवत्सरी लिहून ठेवलेली आहे. दरवर्षी आजच्या म्हणजे चैत्र पाडव्याच्या दिवशी 12 वाजता क्रमाने येणाऱ्या एका पानाचे वाचन करण्यात येते. हे सर्व लिखाण संस्कृतमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये या वर्षी काय भाकीत (भविष्य) आहे, याची मोठी उस्तुकता असते. ते ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी व महिला आणि पुरुष मोठया संख्येने मंदिरामध्ये उपस्थित राहतात.

असे आहे या वर्षीचे भाकीत..

आज गोदड महाराज मंदिरात पंढरीनाथ काकडे व अनिलबाबा काकडे यांनी या संवत्सरीचे वाचन केले. यामध्ये त्यांनी पुढे सांगितले की, या वेळच्या संवत्सरीचे नाव विकरनाम आहे. याचा रवी हा स्वामी आहे. या वर्षी पाऊस चांगला पडेल, पिके चांगली येतील; मात्र रोगराईचा त्रास जनतेस होईल. ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण महिन्यात पाऊस चांगला असून भाद्रपद आणि अश्विनमध्ये भरपूर पाऊस पडेल. कार्तिक मासात कमी पाउस पडला, तरी पौष व माघ महिन्यात जोरदार पाऊस पडेल. खरीप पिके काही भागात कमी राहतील, मात्र रब्बी पिके सर्वत्र जोरदार येतील. परतीचा मान्सून चांगला होईल. एप्रिल व मे महिन्यामध्ये अवकाळी वादळी पाऊस पडणार आहे. काकडे यांनी पुढे सांगितले की, आज जे आपण येथे संवत्सरीचे वाचन करत आहोत, हे केवळ आपल्या तालुक्याचे नसून हे सर्वांचे भविष्य आहे. सर्वाना माहिती असेल की गतवर्षीच्या भाकितात पाऊस पर्वत क्षेत्रात भरपूर पडेल, असे सांगितले होते. तसेच घडले होते. आपल्याकडे कमी पाऊस पडला होता, असेही काकडे म्हणाले.

भाकीत ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी…

काकडे यांनी या वर्षी पंचांगानुसार पाऊस, पाणी आणि पिकांबद्दल सांगितले की, यंदा परिटाच्या घरी पाऊस आहे. चैत्र महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे, मात्र खरीप संकटात असून काही भागांत पाऊस पडणार नाही. रब्बीमध्ये मात्र भरपूर पाऊस आहे. अनेक नक्षत्रांमध्ये पाऊस चांगला पडणार आहे. पिकेही चांगली येतील.
हे बाड वाचण्यापूर्वी मंदिराचे प्रमुख मानकरी मेघनाथ पाटील हे नागेश्वर मंदिराजवळ धान्य पुरून ठेवलेले काढून पाहतात. तिथेदेखील पाऊस चांगला असल्याचे दिसून आले व नंतर वाजतगाजत त्यांना मंदिरामध्ये आणण्यात येते. यानंतर बाडाचे वाचन सुरू करण्यात आले. या वेळीदेखील हे भाकीत ऐकण्यासाठी मंदिर परिसरात प्रचंड गर्दी झालेली होती.