गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन; अतुलनीय नेता, सच्चा देशभक्त गमावल्याची पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भावना

2

एएम न्यूज नेटवर्क – देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या निधनामुळे भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात उत्पल आणि अभिजात ही दोन मुले व सुना, नातवंडे असा परिवार आहे.

स्वच्छ प्रतिमा आणि साधे राहणीमान असलेल्या मनोहर पर्रीकर यांना देशाचे पहिले आयआयटी पदवीधर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाते. गोव्याचे मुख्यमंत्री तसेच देशाचे संरक्षण मंत्री म्हणून पर्रीकर यांनी भरीव कामगिरी केली. त्यांच्या निधनाने देशभरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला शोक व्यक्त

ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. पर्रीकारांबाबत त्यांनी लिहिले कि, मनोहर पर्रीकर हे अतुलनीय नेते, सच्चे देशभक्त आणि असामान्य प्रशासक होते. त्यांचे देशकार्य पिढ्यानुपिढ्या स्मरणात राहील. त्याच्या जाण्याने अतिव दु:ख होत आहे.

साधेपणासाठी प्रसिद्ध

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या साध्यापणासाठी प्रसिद्ध होते. 2000 मध्ये सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी दुस-यांदा या पदाची शपथ घेतली. गोव्यातील सर्वोच्च पद हातात असतानाही आपल्या राज्याचा दौरा करताना आपल्या आमदारांसोबत ते खासगी वाहनाने प्रवास करायचे. त्यातही स्कूटरचा वापर करायचे. मुख्यमंत्री म्हणून ते कोणत्याही सरकारी अथवा खासगी कार्यक्रमात जात तेव्हा ते सामान्य कपडे घालत.

पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यावर झाले होते पत्नीचे निधन

– मनोहर पर्रीकर यांच्या पत्नी मेधा यांचे मे 2001 मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ते पहिल्यादा गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते.

LIVE: पर्रीकरांच्या निधनाने देश शोकसागरात, केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर, 5 वाजता होणार अंत्यसंस्कार