मनमाडमधील चार इंधन चोरट्यांना अटक; 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

2

नाशिक | नांदगांव तालुक्यातील मनमाड परिसरात सक्रीय इंधनमाफियांच्या टोळीला पकडण्यात विशेष पोलीस पथकाला यश आले आहे. पेट्रोल व डिझेलच्या टँकरमधून प्लास्टीक ड्रममध्ये इंधन काढणार्‍या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. विशेष म्हणजे, त्यांच्याजवळ 18 बनावट चाव्यादेखील आढळून आल्या आहेत. चोरीच्या इंधनासह 32 लाख 43 हजार 657 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदगांव तालुक्यातील नागापूर व पानेवाडी परिसरात पेट्रोल-डिझेल कंपन्या आहेत. त्यातून बाहेर पडणार्‍या टँकरमधून इंधन चोरणार्‍या टोळ्या सक्रीय असल्याचे वेळोवेळी उघडकीस आले आहे. त्यातूनच मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. त्यानंतर तपास यंत्रणांचे लक्ष वेधले गेल्याने बॅकफूटवर गेलेल्या इंधनमाफियांनी पुन्हा डोके वर काढल्याच्या तक्रारी होत्या. त्यांच्या बंदोबस्तासाठी अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने गुरुवारी दुपारी 12.30 वाजता मनमाड-नांदगाव रस्त्यावरील सह्याद्री हॉटेल परिसरात छापेमारी केली.

माऊलीनगरमध्ये एमएच 19 झेड 4741 व एमएच 04, 9673 या पेट्रोल व डीझेल टँकरमधून प्रकाश शिवाजी दराडे (रा. मनमाड), विष्णू न्यानबा लटपटे, सतीश गायना पगारे (दोघे राहणार नागापुर ता. नांदगाव), प्रमोद काशीनाथ देसले (रा. झोडगे, ता. मालेगाव) हे पेट्रोल व् डीझेल काढताना आढळले. त्यांनी प्लास्टिक ड्रममध्ये 9 ते 10 लीटर डिझेल व 18 ते 20 लीटर पेट्रोल काढले होते. बनावट चाव्यांच्या सहाय्याने टँकरचे कॉक उघडण्यात आले होते. त्यासाठी वापरलेल्या 18 बनावट चाव्या सापलड्या आहेत. दोन्ही टँकर, बुलेट व चोरीच्या इंधन, ड्रमसह 32 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त करित संबंधितांविरोधात मनमाडज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

मनमाडच्या उपविभागीय अधिकारी रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, हवालदार देवीदास ठोके, पोलीस नाईक शरद देवरे, शिपाई महारु माळी, किरण दासरवार या पथकाने ही कारवाई केली.