माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली | देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. फर्नांडिस हे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला.

जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिग्गजांनी ट्विटरवरुन लढवय्या नेते जॉर्ज फर्नांडिस यांना अखेरचा सलाम केला.