दिल्लीच्या करोलबाग परिसरात हॉटेलला भीषण आग, 17 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली | दिल्लीच्या अत्यंत गजबजलेल्या करोलबाग परिसरातील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी सकाळी लागलेल्या आगीत जवळपास 17 जणांनी प्राण गमावला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक असल्याचीही माहिती मिळाली आहे. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. पहाटे 4 वाजता ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

आगीनंतर राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व 13 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.स तर लेडी हॉर्डिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 5 पैकी दोघांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळाली आहे. घटनेमध्ये बर्मा येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. बर्माहून आलेल्या 8 जणांपैकी या दोघांची ओळख पटलेली आहे. या हॉटेलमध्ये असलेल्या सर्व 65 खोल्या भरलेल्या होत्या. तसेच हॉटेलमध्ये काम करणारे जवळपास 20-25 कर्मचारीही आग लागली तेव्हा आत होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

आगीचे कारण अद्याप समोर आलेले नसले तरी या घटनेनंतर हॉटेलने अनेक नियमांचे उल्लंघन केले असल्याची माहिती समोर येत आहे. या हॉटेलचे दोन मजले अनाधिकृत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

आपने रद्द केला वर्धापन दिन सोहळा –

दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपने आयोजित केलेला दिल्ली सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाचा सोहळा रद्द केला आहे. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.