#CSMT बेपर्वाईचे बळी : अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, महापौरांचे रेल्वे विभागाकडेकडे बोट

5

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईचे महापौर यांनी घटनेनंतर रेल्वेकडे बोट दाखवले आहे. रेल्वे विभागाकडे या पुलाच्या मेंटेनन्ससाठी परवानगी मागितली होती, पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळून गुरुवारी रात्री भीषण दुर्घटना झाला. यात 6 जणांना प्राण गमवावा लागला आहे. तर जवळपास 30 जण या दुर्घटनेत जखमी आहेत. हा पूल कोसळल्यानंतर सर्वच नेते पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची चौकशी केली. अपघातासाठी अधिकाऱ्यांचा बेजबाबदार पणा कारणीभूत असल्याचा सूर सर्वच स्तरातून उठला. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी तातडीने दखल घेत मध्य रेल्वे आणि महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीमुळे मृत्यूस पात्र ठरणे यासाठी कलम 304 (अ) अन्वये आझाद मैदान पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापौरांचे रेल्वेकडे बोट..

दरम्यान, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अपघातानंतर रेल्वे विभागाकडे बोट दाखवले आहे. हा पूल रेल्वे विभागाच्या अख्त्यारित येतो. पण त्याच्या देखभालीची जबाबदारी मात्र महानगरपालिकेवर आहे. त्यामुळे महानगरपालिकेने रेल्वे ब्रिज डिपार्टमेंटकडे याच्या मेंटेनन्ससाठी परवानगी मागितली होती. पण रेल्वेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ते काम झाले नाही असे महाडेश्वर म्हणाले.