राज्यातील 239 हॉटेलांचे परवाने रद्द, स्वच्छतेचे निकष पाळले नाहीत

अन्न व औषध प्रशासन विभागाचा दणका

मुंबई | राज्यातील 239 हॉटेलांना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दणका दिला आहे. स्वच्छतेचे निकष पाळले नाहीत म्हणून या हॉटेलांचे परवाने रद्द करण्यात आलेत. विशेष म्हणजे कारवाईआधी या हॉटेलांना एफडीएने नोटीसही दिली होती. त्यानंतरही हॉटेलांनी त्रुटी दूर केल्या नाहीत, त्यामुळे हा बडगा उगारण्यात आला आहे.

एफडीएने राज्यातील 3500 हॉटेलांची तपासणी केली. त्यातील 1800 हॉटेलांना नोटिसा बजावण्यात आल्या. सुधारणा न केलेल्या हॉटेलांपैकी 239 जणांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती एफडीएच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये अन्नपदार्थ साठवण्यापासून ते तयार करण्यापर्यंतचे विविध प्रकारचे निकष असतात. त्यात ग्राहकांच्या आरोग्याचा व स्वच्छतेचा विचार केंद्रस्थानी असतो. हे निकष पाळले जातात का? याची पाहणी एफडीएने केली होती. यात गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत

या आहेत त्रुटी…

  • ग्राहकांना शिळे पदार्थ दिले जातात.
  • अनेक दिवस साठवलेले पदार्थ वापरले जातात.
  • मांसाहारी पदार्थ कालमर्यादेनंतरही वापरले जातात.
  • पाणी पिण्यायोग्य नाही.
  • अन्नपदार्थांची साठवणूक योग्यरित्या नाही.
  • शिजवण्यात येणाऱ्या पदार्थांचा दर्जा चांगला नाही.
  • भांडी व्यवस्थित स्वच्छ केलेली नाहीत.
  • स्वयंपाकगृहे अस्वच्छ.
  • नोटिसा देऊनही सुधारणा नाही.