मुलीने आत्महत्या केल्याच्या दुःखात पित्यानेही केली आत्महत्या, सोयगाव येथील घटना

2

सोयगाव | एकतर्फी प्रेमप्रकरणाचा संशय घेतल्यामुळे एका शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. आता आपल्या लेकीच्या जाण्याच्या दुःखात पित्यानेही आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. मुलीचा विरह सहन न झाल्यांने तिच्या आत्महत्येच्या पाचव्या दिवशी छोटू गव्हाणे (46) यांनी आपले आयुष्य संपवले.

पाच दिवसांपूर्वी दहावीची परीक्षा देणारी मुलगी दिव्या गव्हाणे हिला गावातील पाच जणांनी एकतर्फी प्रेमाचा आळ घेऊन मारहाण केली होती. तो अपमान सहन न झाल्याने तिने राहत्या घरी विषारी किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली होती. तेव्हा पासून मुलीचे पिता रोज दारु पित होते. गुरुवारी पहाटे चार वाजता ते घरातून निघून गेले. उशीरापर्यंत ते परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. याच वेळी पुतण्या जितेंवाडी शिवारात गेला असता त्याला काकांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिथे धाव घेतली. घटनास्थळी मोनोसिल नामक विषारी किटक नाशक आढळले.

पोलिस पाटलांनी बनोटी दुरक्षेत्राला घटनेची माहिती दिल्याने ठाणे अंमलदार योगेश झालटे, दिपक पाटील, कौतिक सपकाळ यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद रोडगे, ठाणे अंमलदार सुभाष पवार, दिलीप तडवी, कौतिक सपकाळ, योगेश झालटे, दिपक पाटील करीत आहेत.