हिंगोली लोकसभा : वानखेडेंच्या प्रचारात कार्यकर्त्यांचा निरुत्साह, तर बाहेरच्या उमेदवार दिल्याने शिवसैनिक नाराज?

हिंगोली (उमेश चक्कर) । जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. प्रचाराच्या पातळीवर दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडेंबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांचा निरुत्साहच जास्त दिसून येतोय. कार्यकर्त्यांचा हा निरुत्साह वानखेडेंना नडणार की काय, अशी चर्चा सुरू आहे.

बाहेरचा उमेदवार दिल्याने शिवसैनिक नाराज?

युतीतही खूप आलबेल आहे, अशी परिस्थिती नाही. शिवसेनेने बाहेरचा उमेदवार लादल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतंय. ज्यांच्यावर प्रचाराची पूर्ण मदार असते त्या कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या अडचणीत भर पडली आहे. या दोन प्रमुख उमेदवारांव्यतिरिक्त इतर 26 उमेदवारांनीही लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकलेले आहेत.

हिंगोलीत 18 एप्रिलला मतदान

हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर निवडणूक आली असताना कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवून आणण्यात आघाडीचे उमेदवार सुभाष वानखडे यांना मात्र यश आलेले नाहीये. वरकरणी कार्यकर्ते प्रचार करत असल्याचे दाखवत असले तरी गत निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी दिल्याने जुने पदाधिकारी, उत्साही कार्यकर्ते निवडणुकीकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. आघाडीमधील ठराविक गटच वानखेडेंच्या सोबत असल्याचे दिसून येतंय.

कार्यकर्त्यांची नाराजी, उमेदवार हैराण

विद्यमान खासदार राजीव सातव यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने कार्यकर्तांचा हिरमोड झालेला आहे. त्यामुळे कार्यकर्ते वानखेडेंच्या प्रचारात फारसा उत्साह दाखवत नाहीत. वानखेडेंनी पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येतयं.

शिवसेना-भाजप व घटक पक्षांच्या महायुतीमध्येही असाच काहीसा प्रकार समोर आलाय. शिवसेनेने बाहेरचा उमेदवार लादल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला नांदेडमधून उमेदवार बोलवावा लागला. नांदेड येथील विद्यमान आमदार हेमंत पाटील हे शिवसेनेचेच आहेत. पाटील यांचे बालपण हिंगोलीत गेले असे सांगितले जात असले तरी या गोष्टीला आता बराच वेळ झालाय. गेली अनेक वर्षे त्यांचा हिंगोलीशी संपर्कच नव्हता. हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर शिवसेनेतीलच निवडणूक लढवू इच्छिणारे अनेक पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तसेच मित्रपक्ष असलेल्या भाजपमधील काही गटांच्या नाराजीचा फटकाही पाटील यांना बसू शकतो. त्यामुळे हिंगोली मतदारसंघातील निवडणूक पाटील यांना वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही. पक्षातच सक्षम, प्रामाणिक पदाधिकारी खासदारकीकरिता पात्र असताना शिवसेनेला बाहेरून उमेदवार का बोलवावा लागतो, असा प्रश्न मतदारसंघात सर्वत्र चर्चिला जातोय. वंचित आघाडीचे मोहन राठोड यांचा रथसुद्धा अनेक गावांमध्ये पोहोचलाच नाहीये. जिल्ह्यातील खरी लढत ही सुभाष वानखेडे व हेमंत पाटील या दोघांत असली तरी मतदार कुणाला कौल देतात यासाठी 23 मेची वाट पाहावी लागणार आहे.