‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाला निवडणूक आयोगाचा दणका, आचारसंहितेच्या काळात चित्रपट प्रदर्शनावर बंदी

एएम न्यूज नेटवर्क । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर बेतलेला चरित्रपट निर्मितीपासूनच वादग्रस्त राहिला आहे. आठवडाभरापासून ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या रिलीजवरून वाद-प्रतिवाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टातून क्लीन चिट मिळाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणला आहे.

वृत्तसंस्थेनुसार, नरेंद्र मोदी बायोपिकची रिलीज डेट 11 एप्रिल होती, परंतु आता निवडणूक आयोगाच्या दणक्यामुळे हा चित्रपट आचारसंहितेच्या काळात कोणत्याही माध्यमात प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका वठवत आहे. निवडणूक आयोगाने कोणत्याही इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया अथवा सिनेमेटोग्राफ माध्यमातून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनाई केली आहे.

यासोबतच एनटीआर लक्ष्मी, उद्यमा सिम्हम यांच्याही प्रदर्शनावर आचारसंहितेच्या काळात बंदी आणण्यात आली आहे. या चित्रपटांमुळे मतदार प्रभावित होण्याची शक्यता लक्षात घेऊन आचारसंहितेच्या काळात हे चित्रपट प्रदर्शित करू नयेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.