शिवस्मारकाचे काम सुरू करू नका, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

राज्य, केंद्रालाही नोटीस

नवी दिल्ली | अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम सुरु करु नका, असे तोंडी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. स्मारकाच्या कामाला अंतरिम स्थगिती द्यावी, यासाठी ‘कॉन्झर्व्हेशन अॅक्शन ट्रस्ट’ या पर्यावरणवादी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवस्मारकासाठी केंद्र सरकारने सीआरझेडच्या नियमावलीमध्ये दुरुस्ती केली आहे. या दुरूस्तीनुसार एखादे स्मारक मानवी वस्तीपासून दूर असेल आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत नसेल तर राज्य सरकारला जनसुनावणी करण्याची आवश्यकता नाही. याच दुरूस्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.