खोतकर काँग्रेसच्या गळाला? गोपनीय बैठकीत अब्दुल सत्तार यांनी ऑफर दिल्याची चर्चा

2

औरंगाबाद | काँग्रेसचे आमदार आणि जालन्याचे संभाव्य उमेदवार अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी औरंगाबादेत खोतकर यांची गोपनीय भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीनंतर खोतकरांबाबत दोन दिवसांत गुड न्यूज मिळेल असे संकेत सत्तारांनी दिले आहेत.

जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवेच लढणार असे स्पष्ट आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. पण त्यामुळे झालेल्या खोतकरांच्या नाराजीचा फायदा उचलण्यासाठी काँग्रेस सरसावली आहे. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांची गोपनीय बैठक गुरुवारी झाली. औरंगाबादमधील सातारा परिसर येथे फिरोज पटेल यांच्या कार्यालयात दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

या बैठकीत खोतकरांना काँग्रेसकडून जालन्यातून लढण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर सत्तारांनी बैठकीनंतर दिलेली प्रतिक्रिया पाहता खोतकर काँग्रेसच्या गळाला लागणार असा विश्वास त्यांना असल्याचे दिसतेय. त्यामुळे आगामी दोन दिवसांत खोतकरांकडून काय निर्णय घेतला जाणार यावर जालन्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.