तिरोडा तालुक्यात होत आहे आदर्श आचारसंहितेचा भंग, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार 

1

गोंदीया | आगामी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक 2019 यासाठी 10 मार्चला सायंकाळपासून आचार संहिता लागू झाली आहे. 11 एप्रिलला भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी सर्व विभाग प्रमुख, नोडल अधिकारी व राजकीय पक्षांची बैठक घेऊन भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेचे पालन करण्याचे निर्देश दिले. मात्र तिरोडा तालुक्यात आदर्श आचारसंहितेचा भंग तिरोडा नगर परिषदचे सीओ तसेच महाराष्ट्र राज्य महावितरण विज कंपनीचे अधिकाऱ्यांनी केला असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी उपस्थितांना भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सुचना देऊन आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा वापर राजकीय कामासाठी वापर केला जाणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले होते. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर, व झेंडे काढून घेण्याच्या सुचना सर्व नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यावर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशी कृती कोणत्याही शासकीय विभाग, अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेण्यास सांगितले असूनही तिरोडा नगर परिषदचे सीओ विजय देशमुख यांनी एका मराठी दैनिक वृत्तपत्रात 12 मार्च रोजी विकास कामांची ई-निविदा व हिंदी दैनिकात बाजार वसुलीची ई निविदा प्रकाशित केली तसेच महाराष्ट्र राज्य महावितरण विज वितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता ग्रामिण शाखा यांच्या कार्यालया बाहेर असलेल्या सुचना फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विकास योजनांची बॅनर काढण्यात आलेले नाही. ज्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. आचारसंहितेचा भंग झालेला नाही असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे असुन वरिष्ठ कोणती कार्यवाही करतात याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.