चीनने पुन्हा केला मसूद अझहरचा बचाव, जागतिक दहशतवादी घोषित करण्यात केला नकाराधिकाराचा वापर

3

नवी दिल्ली | जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याचा जागतिक दहशवादी घोषित होण्यापासून पुन्हा एकदा बचाव झाला आहे. चीनने संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. यामुळे भारताच्या प्रयत्नांना अपयश आले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन यांनी 27 फेब्रुवारी रोजी मांडला होता.

14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान तणाव निर्माण झाला होता. हा प्रस्ताव फेटाळून लावण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने 10 दिवसांची मुदत दिली होती. यानंतर चीनने या प्रस्तावात नकाराधिकाराचा वापर केला.

हा कालावधी बुधवारी न्यूय़ॉर्कच्या वेळेनुसार दुपारी तीन वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री साडे बारा वाजता संपणार होता. मात्र हा काळ संपण्याच्या थोडा वेळापुर्वीच चीनने या प्रस्तावात खोडा घातला. चीनने प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी मुदत मागितली आहे. ही मुदत 6 महिन्यांची असणार आहे. पुढे 3 महिने ही मुदत वाढवली जाऊ शकते.

चीन मसूदला का वाचवतो?

– पाकिस्तानात चीनचं 7 लाख कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष्य
– सीपॅकमध्ये चीन 55 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार
– याशिवाय पाकिस्तानात इतर प्रकल्पांमध्ये 3.2 लाख कोटी खर्च
– पाकमधल्या नोंदणीकृत परदेशी कंपन्यांपैकी सर्वाधिक 77 चीनच्या
– चीनसाठी भारत सर्वात मोठा आर्थिक प्रतिस्पर्धी
– परिणामी चीनकडून अंतर्गत प्रश्नांवरुन भारताची कोंडी
– मुस्लिमांवरच्या कारवाईसंदर्भात पाकिस्तान चीनच्या बाजूने
– चीनमध्ये उईगर मुस्लिमांवर चीनकडून अनेक निर्बंध
– भारत आणि अमेरिकेतले सुमधूर संबंध चीनला खटतात
– मसूदबाबत भारताच्या भावनेप्रमाणेच चीनचा दलाई लामांना विरोध
– 2009 साली मसूविरोधात पहिला प्रस्ताव, त्यानंतर 3 वेळा आडकाठी

10 वर्षात 4 वेळा भारताचा प्रस्ताव फेटाळला
पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात असलेल्या जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला चीनने पुन्हा एकदा वाचवले आहे. विशेष म्हणजे चीनने मसूदला गेल्या 10 वर्षात तब्बल 4 वेळा वाचवले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूदला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनच्या प्रस्तावावर चीनने व्हेटो वापरला. पुराव्याशिवाय कारवाई करण्याला आपला विरोध असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे.