चंद्राबाबूंचे केंद्राविरोधात एकदिवसीय उपोषण, म्हणाले-मोदींना पुन्हा राजधर्माचा विसर

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील उपोषण स्थळी भेट दिली

आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी

नवी दिल्ली | विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू एका दिवसाच्या उपोषणावर बसले आहे. आंध्रप्रदेशमधून स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीवेळी केंद्राने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी चंद्राबाबुंनी केली आहे. मोदींनी रविवारीच आंध्रप्रदेशात एका सभेत चंद्राबाबू नायडूंवर जनतेचा पैसा राजकीय प्रचारासाठी उडवल्याची टीका केली होती. त्यानंतर लगेचच आज चंद्राबाबूंनी उपोषणाच्या माध्यमातून टीकेची झोड उडवली आहे.

चंद्राबाबूंनी उपोषणादरम्यान मोदींवर टीकेची झोड उडवली आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार नसाल तर ती कशी पूर्ण करून घ्यायची हे आम्हाला माहिती आहे, असे चंद्राबाबू म्हणाले. गुजरात दंगलींच्या वेळी राजधर्म पाळला गेला नव्हता असे अटलजी म्हणाले होते. आता आंध्र प्रदेशबाबतही तसेच होत असल्याचे चंद्राबाबू म्हणले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी माझी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे माजीद मेमन यांनी चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.