बुलेट ट्रेनच्या मार्गात अडचणी, मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्र सरकारने फेटाळली

मुंबई – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकवरून नेण्यात यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच अडचणीत सापडलेली बुलेट ट्रेन आणखी वादात सापडण्याची शक्यता आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा योग्य फायदा महाराष्ट्रालाही मिळावा यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकवरून वळवण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. मात्र, यावर केंद्राकडून विचार करण्यात आला नाही. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. त्यासाठी खास जपानी यंत्रणेची मदत घेण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असलेली टीका, भूमिअधिग्रहणास शेतकऱ्यांचा असलेला विरोध, तसेच स्थानिकांकडून होणारा विरोध यामुळे बुलेट ट्रेनच्या मार्ग आणखी खडतर बनला आहे.