बुलडाणा येथे भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जागीच ठार, पाच जखमी

बुलडाणा | सोमवारी सकाळी एक अपघाताची बातमी समोर आली आहे. ट्रक आणि स्कार्पिओच्या जोरदार धडकेत 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर 5 जण गंभीर जखमी आहेत. मेहकर-डोनगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओने ट्रकला धडक दिली. यामध्ये स्कार्पिओचा चुराडा झाला आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महू येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे व जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा मृत्यू झालाय तर मृतांमध्ये नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.