अनैतिक संबंधाने केला विवाहित तरुणाचा घात, प्रेयसीनेच काढला काटा

0
1466

तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

कर्जत (रायगड) | अनैतिक संबंधामुळे विवाहित तरूणाची हत्‍या झाल्‍याची खळबळजनक घटना नेरळ जवळील वंजारपाडा येथे उघडकीस आली आहे. नंदकुमार रघुनाथ कालेकर ( वय 27) असे तरुणाचे नाव आहे. तो विवाहित असून त्‍याचे एक दीड वर्षांचे बाळदेखील आहे. 13 ऑक्टोबर रोजी तो घरातून बेपत्ता झाला होता. तब्‍बल एका महिन्‍याच्‍या तपासानतंर गुरूवारी सायंकाळी त्‍याचा मृतदेह नेरळ दामत येथील रेल्वे ट्रॅक शेजारी पोलिसांना सापडला.

अनैतिक संबंधामधून प्रेयसीनेच काढला काटा
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, नंदकुमार रघुनाथ कालेकर हा जेमतेम शिक्षण असलेला विवाहित तरुण होता. घरी दीड वर्षाचे एक गोंडस बाळ देखील होते. एवढा सुखी संसार असूनही नंदकुमार याचे तळवडे येथील निशा विरले या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. लग्न करण्यासाठी निशाने नंदकुमारमागे तगादा लावला होता. मात्र आधीच विवाहित असलेल्या नंदकुमार चालढकल करत होता. या गोष्टीचा राग आल्याने आपला दुसरा प्रेमी असणाऱ्या अनिल राऊतला सोबत घेऊन नंदकुमारचा काटा काढण्याची योजना निशाने आखली. यासाठी निशानेच 13 ऑक्‍टोबररोजी नंदकुमारला बोलावून घेतले होते. अर्ध्या तासात येतो असे सांगून नंदकुमार घराबाहेर पडला. नेरळ दामत या गावांमध्ये असलेल्या रेल्वे रुळाच्या बाजूला त्याला विषमिश्रित मद्य आरोपी अनिलने पाजले. त्यावेळी अनिलचा मित्र मंगेशही तेथे होता. त्यानंतर ओढणीने गळा आवळून नंदकुमारचा खून करण्यात आला.

तिन्‍ही आरोपी निशा, अनिल आणि मंगेश यांनी खुनाची कबुली दिल्यानंतर नेरळ पोलिसांनी आरोपी अनिल याला जागेवर घेऊन जाऊन मृतदेह असल्याची खात्री केली. मृतदेह पूर्ण कुजून गेल्या अवस्थेत मिळून आला. त्याची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचा सांगाडा हा वैज्ञानिक परीक्षणासाठी मुंबई येथे पाठवण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

पोलिसी खाक्‍या दाखवताच आरोपींची कबुली
अर्ध्या तासात येतो असे सांगून गेलेला नंदकुमार नंतर न परतल्‍यामुळे व्यथित झालेले त्‍याचे वडील रघुनाथ कालेकर यांनी नेरळ पोलीस ठाण्यात नंदू हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नेरळ पोलीस, कालेकर कुटुंबीय व वंजारपाडा ग्रामस्थ यांनी परिसर व आजूबाजूच्या शहरात जंग जंग पछाडून काढले, मात्र त्याचा पत्ता काही लागला नाही. नेरळ पोलिसांनी हे प्रकरण काहीतरी वेगळे असल्याचे ओळखून वेगळ्या दिशेने तपास सुरू केला. त्यात काही संशयितांना उचलून त्यांच्याकडे कसून चौकशी केली. मात्र पोलिसांना यश येत नव्हते. एव्हाना नंदकुमार बेपत्ता होऊन एक महिना ऊलटला होता. शेवटी नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी संशयित असलेल्या निशा विरले, मंगेश भवारे, अनिल राऊत यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच या तिघांनी नंदकुमार कालेकर याचा खून केल्याची कबुली दिली.