‘त्या’ वाघिणीच्या मारेकऱ्याचा गावकरी करणार ‘सत्कार’

0
11

 

यवतमाळ | गेल्या काही दिवसात ज्या अवनी वाघिणीमुळे माहाराष्ट्राचे राजकारण तापल्या गेले होते. त्याच अवनी वाघिणीची शिकार करणाऱ्या नवाबचा राळेगाव तालुक्यातील गावक-यांकडून संयुक्त सत्कार केला जाणार आहे. अवनी या वाघिणीने पांढरकवडा, कळंब, राळेगाव या तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला. अवघ्या काही महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. या १३ जणांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघडे पडले, कुटुंबातील सदस्यांवर आभाळ कोसळले. अवनीच्या दहशतीमुळे तीन तालुक्यातील वाघग्रस्त गावच्या नागरिकांनी गेल्या काही महिन्यांपासून शेतावर जाणे बंद केले होते. सायंकाळनंतर ग्रामीण भागातील रस्ते ओस पडत होते. अखेर हैदराबाद येथील प्रसिद्ध शिकारी नवाब व त्याच्या मुलाने अवनीला गोळी घालून ठार करून या गावक-यांची दहशतीतून सुटका केली.

नरभक्षक असल्याच्या संशयावरून अवनी वाघिणीच्या करण्यात हत्येबाबत प्राणीप्रेमींकडून तीव्र संताप होत आहे. या वाघिणीला मारणारा शिकारी नवाब याच्याविरोधात देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. मात्र  असे असले तरी त्याच नवाबचा मंगळवारी, १३ नोव्हेंबरला सायंकाळी राळेगाव तालुक्यातील सावरखेड या गावात लगतच्या काही गावक-यांकडून संयुक्त सत्कार केला जाणार आहे.

या नवाबला देशभरातील वन्यजीवप्रेमींकडून तीव्र विरोध होत असला तरी पांढरकवडा वनविभागांतर्गत वाघग्रस्त गावातील सर्वच नागरिक मात्र त्याच्यावर खूप खूश आहेत. म्हणूनच या गावक-यांनी मंगळवारी नवाब व त्याच्या मुलाचा सत्कार आयोजित केला आहे. लगतच्या वाघग्रस्त अनेक गावांनी एकत्र येऊन या सत्काराचे आयोजन केले आहे.