रॉकेल पिल्याने मुंबईत एका वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

0
11

मुंबई– दिवाळीनिमित्त मामाच्या घरी आलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचा रॉकेल पिल्याने मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. कार्तिक सोनावने असे चिमुरड्याचे नाव आहे. तर, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कार्तिकचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत चिमुरड्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

पुण्याला राहणाऱ्या भाग्यश्री सोनावने या दिवाळीनिमित्त मुलासह माहेरी आल्या होत्या. रविवारी घरात खेळत असताना कार्तिकने रॉकेल पिले. जमिनीवर रॉकेल सांडले होते. ते कार्तिकने पाणी समजून पिले, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. रॉकेल पिल्याने काही वेळातच कार्तिकची प्रकृती खालावली होती. त्यातच, रविवार असल्याने शहरातील अनेक रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नव्हते. शेवटी जियास या रुग्णालयात त्याला नेण्यात आले. उपचारानंतर कार्तिकची प्रकृती सुधारली होती. मात्र, सोमवारी सकाळी कार्तिकची प्रकृती पुन्हा खालावल्याने डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णवाहिकेतून जात असतानाच कार्तिकचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कार्तिकचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तर पोटात जास्त प्रमाणात रॉकेल गेल्यानेच कार्तिकचा मृत्यू झाल्याचा दावा जियास रुग्णालय प्रशासनाने केला आहे.