प्रथमच ठाकरे कुटुंबीय अयोध्येच्या दौऱ्यावर, अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था तैनात

0
19
उद्धव ठाकरे अयोध्येसाठी रवाना

मुंबई | ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, असा जयघोष करत हजारो शिवसैनिक अयोध्येत पोहोचले आहेत. तर शरयू नदीकिनारी अवघे भगवेमय वातावरण करण्यात शिवसैनिकांना यश आले आहे. लवकरात लवकर राम मंदिराची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आता हिंदू शांत बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे हे सहकुटुंब आज अयोध्येत दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरे या दौऱ्यामध्ये लक्ष्मण किला भेट, शरयू नदीच्या तिरावर राम आरती, साधू-महंतांचे आशीर्वाद घेणार आहेत. राम मंदिर निर्माणासंदर्भात भाजपा सरकारनं जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी उद्धव ठाकरे हा दौरा करत आहेत. राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी काही हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना 25 नोव्हेंबरला अयोध्येत एकत्र येणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादिवशीच विश्व हिंदू परिषदेनेही धर्मसंसदेचे आयोजन केले आहे.

अयोध्येला छावणीचं रुप
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे अयोध्येत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक अतिरिक्त पोलिस महासंचालक, एक पोलिस महासंचालक, तीन वरिष्ठ पोलिस अधीक्षक, 10 अतिरिक्त पोलिस अधीक्षक, 21 क्षेत्र अधिकारी, 160 पोलिस निरिक्षक, 700 कॉन्स्टेबल, पीएसीच्या 2 आणि आरएएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहे.

17 मिनिटांत बाबरी तोडली तोडली, मंदिर कायद्यासाठी किती वेळ लागेल? – संजय राऊत
‘आम्ही जर १७ मिनिटांत बाबरी मशीद पाडू शकतो, तर अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी अाम्हाला किती वेळ लागेल?,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी भाजपला आव्हान दिले आहे. एवढेच नव्हे, तर राम मंदिराला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. जो कोणी मंदिर उभारण्यास विरोध करेल त्याला देशात फिरणे मुश्कील होईल, असा, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. या दौऱ्याच्या तयारीसाठी खासदार संजय राऊत अयोध्येत तळ ठोकून आहेत.

 

अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र खिशात, मनसेची पोस्टरबाजी
शिवसेनेने हाती घेतलेल्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेला डिवचलं आहे. ’अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र अजूनही खिशात’ असं लिहिलेले पोस्टर्स मनसेने शिवाजी पार्क परिसरातील सेना भवनाच्या समोरच झळकवली आहेत.