मुुख्‍यमंत्र्यांच्‍या नागपुुरात गुंडाराज: भररस्‍त्‍यात रिक्षाचालकाची निर्घृण हत्‍या

0
9

नागपूर | राज्‍याचे गृहमंत्रीदेखील असलेल्‍या मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नागपूरातच दिवसाढवळ्या कायदा सुव्‍यवस्‍थेचे धिंडवडे निघत आहे. शनिवारी नागपूरात मारहाणीच्‍या दोन घटना घडल्‍या असून एका घटनेत रिक्षाचालकाचा भररस्‍त्‍यात निर्घृण खून करण्‍यात आला तर दुस-या घटनेत एक तरूण गंभीर जखमी झाला आहे.

नागपूरच्‍या नंदनवन परिसरात दोन रिक्षाचालकांनी एका मालवाहू रिक्षाचालकाची हत्‍या केली आहे. राजेंद्र देशमुख असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. राजेंद्र देशमुख यांना आधी मारहाण करत अर्धमेल्या अवस्थेत ऑटोमध्ये खरबी चौकात आणले आणि नंतर भरचौकात त्यांना ऑटोच्या बाहेर काढून, लाठ्या-काठ्यांनी मारून त्‍यांची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मागील आठवड्यात राजेंद्र देशमुख यांचा काही रिक्षाचालकांसोबत वाद झाला होता. राजेंद्र यांनी त्यांना मारहाण केली होती. त्यामुळे राजेंद्र यांचे परिसरात वर्चस्व वाढत असल्याचे पाहत आरोपी गोलू ठाकरे आणि एजाज अनिस यांनी त्यांची हत्या केली.

दुसरीकडे नागपूरच्या जगनाडे चौक परिसरात पाच जणांनी एकास जबर मारहाण केली आहे. त्यात धीरज टेकाडे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. धीरज हा आपले मित्र राहुल धकाते आणि नितीन इंगळे यांच्‍यासह जगनाडे चौकातील बारमध्‍ये दारू पिण्‍यासाठी गेला होता. बाहेर आल्‍यावर 5 तरूण राहुल याच्‍या बाईकवर बसलेले त्‍यांना आढळून आले. यावरून या दोन गटांमध्‍ये किरकोळ वाद झाला. त्‍यांनतर धीरज, राहुल आणि नितीन तेथून निघून गेले. मात्र काही वेळानंतर धीरज आणि नितीन तेथे पुन्‍हा आले आणि धीरजने 5 जणांपैकी एकाच्या कानशिलात लगावली. यामुळे त्‍यांच्‍यातील वाद भडकला आणि त्‍या 5 जणांनी धीरजला बेदम मारहाण केली. राजेश जिवने, उद्देश ऊर्फ दादू पारसी, प्रीतम लोखंडे आणि अभिजीत काळे अशी आरोपींचे नावे आहेत.

या घटनांमुळे मुख्‍यमंत्र्यांच्याच नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्‍थेवर प्रश्‍नचिन्‍ह उभे राहिले असून त्‍यांच्‍या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जात आहे.